मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात सद्यस्थितीमध्ये मुंबई वगळता सर्वत्र थंडीचा कडाका बघायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पुणे आणि मराठवाडा या सर्वच ठिकाणी किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. गेले 3 दिवस राज्यात थंडीचा जोर कायम आहे. अशातच आता राज्यातील तुरळक जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या तीन जिल्ह्यात 6 जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरात 6 जानेवारीला निरभ आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
6 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पुण्यात थंडीचा जोर कायम असणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जानेवारीला सामान्यत: ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 2 दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भातील नागपूरमध्ये 6 जानेवारीला अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे.
नाशिकमध्ये 6 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल घडून आलेले बघायला मिळाले. थंडीचा जोर वाढत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागांत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे.