बीड/महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. तरीदेखील कराडवर कारवाई झाली नाही. या उलट तो बिनदास्त फिरत होता.
वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणा देशभर जंगजंग पछाडत आहे. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. या काळात त्याच्यापर्यंत यंत्रणा का पोहचल्या नाहीत? त्याचे लोकेशन माहित असताना त्याला ताब्यात का घेण्यात आले नाही? हा प्रश्न उपस्थित झाला होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलाही वाल्मिक कराडने काहीजणांना भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
वाल्मिक कराडने कधी, कुठं केला प्रवास?
वाल्मिक कराड हा 9 डिसेंबर रोजी परळीमधून बाहेर पडला.
10 आणि 11 डिसेंबर रोजी तो उज्जैनमध्ये दर्शनासाठी मंदिर परिसरात होता. 11 तारखेला त्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने दिवगंत भाजप नेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचे लोकेशन परळी दाखवण्यात आले.
13 डिसेंबर रोजी त्याचे लोकेशन समजून आले नाही.
14 डिसेंबरला वाल्मिक कराडने दत्त जयंती निमित्त पोस्ट टाकली
15 डिसेंबर रोजी त्याने धनंजय मुंढे आणि पंकजाताई मुंढे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट केली.
16 तारखेला वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य होता. त्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.