पुणे/महान कार्य वृत्तसेवा
भाजपचे आमदार नितेश राणे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आपल्या वादग‘स्त वक्तव्यामुळे अनेकदा ते अडचणीतही सापडतात. मात्र पुन्हा एकदा नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी केरळ राज्याचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला असून प्रियंका गांधी यांना दहशतवाद्यांनी मतदान केल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे. राणेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रासह केरळमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी पुरंदर तालुक्यातील सासवड इथे अफजल खान वधाचा भव्य कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता. या कार्यक‘माला राणेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी काँग्रेसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांनी केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला आहे. शिवाय अफजल खानाच्या वधाचे पोस्टर भारतात नाही लावायचे, तर मग पाकिस्तानात जाऊन लावायचे का? असा सवालही राणेंनी विचारला.
सासवड इथे केलेल्या भाषणात नितेश राणे म्हणाले, ’’केरळ हे मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बहीण तिथून निवडून येते. सगळे दहशतवादी त्यांना मतदान करतात. दहशतवादी लोकांना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत, अशी टीका नितेश राणेंनी केली. राणेंच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नितेश राणे यावेळी म्हणाले की, अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखवतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं. पण ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात. आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. असं असताना मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत ? मग पाकिस्तान मध्ये लावणार का ? चार-दोन टकल्यांच्या भावना दुखवणार असतील तर मग त्यांनी पाकिस्तान बांगलादेश येथे जाऊन दाडी कुरवाळावी, असंही नितेश राणे म्हणाले.