Spread the love

1 खासदार 10 आमदार; महायुती भक्कम

कोल्हापूर/विठ्ठल बिरंजे
सरत्या वर्षात महायुतीने घवघवीत यश मिळविले. लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील माने यांच्या रूपाने 1 खासदार आणि जिल्ह्यातील 10 ही मतदार संघात महायुतीचे आमदार विजयी झाले अन् 2024 हे वर्ष महायुतीला बळ देवून गेले.
वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुरू असलेला झंझावात रोखण्यात वर्षभरात महायुतीच्या नेत्यांना यश मिळाले. मागील वर्षभरात लावलेल्या जोडण्या महायुतीला बळ देणार्‍या ठरल्या. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली. कोल्हापूरातून श्रीमंत शाहू छत्रपती यांनाच मैदानात उतरून आ. सतेज पाटील यांनी खेळलेली चाल यशस्वी ठरली. मात्र हातकणंगले लोकसभा मतदार संघात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या जोडण्यांमुळे महाविकास आघाडीच्या खेळीला खिळ बसली आणि धैर्यशील माने विजयी झाले. या विजयात माजी आ. प्रकाश आवाडे, आ. विनयराव कोरे यांच्यासह मराठा कार्ड या मतदारसंघात पुन्हा एकदा यशस्वी ठरले. तर यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंघ महायुतीच्या नेत्यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी ठरल्या.
कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करायचा या इराद्याने मैदानात उतरलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही धोबीपछाड बसला. चंदगड विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार पराभूत झाला असलातरी अपक्ष रूपाने भाजपचाच कार्यकर्ता शिवाजीराव पाटील विजयी झाले. करवीरमधून अनपेक्षितपणे चंद्रदीप नरके यांना यश मिळाले. उत्तर विधानसभा मतदार संघात जयश्री जाधव या विद्यमान आमदारांना काँग्रेसने डावलले आणि राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली. तीही उमेदवारी अंतिम क्षणापर्यंत टिकली नाही. मधुरिमाराजे यांना ऐनवेळी मैदानात उतरविण्यात आले. पण काँग्रेसचेच खा. श्रीमंत शाहू महाराज यांनी ऐनवेळी सुनेची उमेदवारी माघारी घेत काँग्रेसलाच घरचा आहेर दिला. यामुळे सतेज पाटील यांची नाच्चकी झाली. नाईलाजास्तव उसना उमेदवार घ्यावा लागला. या लढाईत लढावू नेते राजेश क्षीरसागर मोठ्या फरकाने विजयी झाले. अशीच परिस्थिती शाहूवाडीमध्येही दिसून आली. सत्यजीत पाटील-सरूडकर विजयी होणार असा ठाम विश्‍वास व्यक्त केला जात होता. परंतू, सावकर यांनी आघाडीचे मनसुबे धुळीस मिळविले. हातकणंगलेमध्ये अशोकराव माने यांच्या रूपाने महायुतीला बळ मिळाले. शिरोळमध्ये यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळावर विजय मिळविला. इचलकरंजीत विळ्याभोपळ्याचे सख्खे असलेल्या आवाडे-हाळवणकर यांना एकत्रित करण्यात भाजप नेत्यांना यश आले आणि राहुल आवाडे आमदार झाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे बंडही थंड करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आल्यामुळेच राहुल आवाडेंचा मार्ग सुकर झाला. दक्षिणमध्ये पाच वर्षे पायाला भिंगरी लावून काम केल्याचे फळ महाडिकांना मिळाले आणि 10 ही मतदार संघात महायुतीने बाजी मारली. 2024 हे वर्ष महायुतीला बळ देणारचं ठरलं, असं म्हटले तर वावगं ठरणार नाही.