मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
खासदार रवींद्र वायकर यांच्या मोटरगाडीला गोरेगाव परिसरात रविवारी रात्री अपघात झाला. वायकर यांचा चालक मोटरगाडी चालवत होता. अपघात किरकोळ स्वरूपाचा असून त्यात कोणीही जखमी झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
गोरेगाव पूर्व येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एक मोटारसायकलस्वार वायकर यांच्या मोटरगाडीच्या उजव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी मोटारसायकलची वायकर यांच्या गाडीला धडक बसणार होती. अपघात टाळण्यासाठी चालकाने मोटरगाडी बाजूला वळवली. त्यावेळी मोटरगाडी तेथील ट्रकला घासली. त्यामुळे वायकर यांच्या मोटरगाडीचे नुकसान झाले. मोटरगाडीच्या दरवाजाचे हँडल तुटले आहे. वायकर त्यावेळी मोटरगाडीतच होते, पण त्याना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वनराई पोलीस सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रीकरण तपासत असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.