आतापर्यंत चार आरोपींना अटक
बीड/महान कार्य वृत्तसेवा
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. याचदरम्यान बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकार्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना काल रात्रीच पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाहीय, असं सीआयडीच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
चारही बाजूंनी कोंडी झाल्यामुळे वाल्मिक कराड हे आता पोलिसांसमोर शरणागती पत्कारणार असल्याचे सांगितले जात आहे. वाल्मिक कराड हे सोमवारी संध्याकाळ पर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत बीड पोलीस अथवा सीआयडीच्या अधिकार्यांसमोर शरण जातील, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता वाल्मीक कराड पोलिसांनी कधी शरण जाणार आणि त्यांच्या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येणार, याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
आतापर्यंत चार आरोपींना अटक-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा या गावातून ताब्यात घेतले होते, तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. विष्णू चाटे याला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या. पण अजूनही तीन आरोपी फरार आहेत.
आम्हाला न्याय द्या- धनंजय देशमुख
बीड जिल्ह्यात कायद्याचा धाक राहिला असता तर माझा भाऊ आज माझ्या घरात राहिला असता. मात्र त्यांना कायद्याची भीती उरली नाही. त्यांनी माझ्या भावाला संपवलं आज माझ्या बाबतीत सगळेच लोक येत आहेत बोलतायेत. धीर देतायेत पण घरात गेल्यानंतर आज माझा भाऊ नसल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे. ती कशाने भरून निघेल तुम्ही मला न्याय मिळवून द्या, अशी भावना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर व्यक्त केली.