Spread the love

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता

नवी मुंबई/महान र्का वृत्तसेवा
स्वच्छ नवी मुंबई शहर सर्व दृष्टीने स्वच्छ असावे याकरिता दररोजच्या नियमित स्वच्छतेप्रमाणेच शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने दुर्लक्षित व पडीक जागांची तसेच महानगरपालिकेच्या अखत्यारीत नसलेल्या सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्रामु‘याने पदपथांच्या कडेला घट्ट झालेली माती तसेच झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या आणि पालापाचोळा यांची बारकाईने स्वच्छता करण्यात आली.
नेरूळ येथील एलपी जंक्शनपासून नेरूळ रेल्वे स्टेशन आणि नेरूळ रेल्वे स्टेशन ते हावरे जंक्शन तसेच हावरे जंक्शन ते अपोलो जंक्शन अशा सर्व बाजूंच्या मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे सायन पनवेल हायवेवरही साफसफाई करण्यात आली.
विशेष म्हणजे पालापाचोळा व कचरा उचलून झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अत्याधुनिक फॉगर्स मशीनद्वारे स्वच्छ केलेले पदपथ, रस्ते आणि दुर्लक्षित जागा पाणी मारून स्वच्छ करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मलप्रकि‘या केंद्रातून शुद्ध केलेल्या प्रकि‘याकृत पाण्याचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे फॉगर्स वाहनाद्वारे रस्ते सफाई केल्याने हवेतील धुळीचे प्रमाण कमी होऊन प्रदूषणही कमी होणार आहे. अशाच प्रकारची सखोल स्वच्छता मोहीम तुर्भे विभाग कार्यालय परिसरातही राबविण्यात आली. नियमित स्वच्छतेप्रमाणेच अशा प्रकारच्या डीप क्लिनिंग मोहिमा राबवून नवी मुंबई परिसरातील सर्वांगीण स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.