लडाखमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा चीनच्या सीमेलगत उभारण्यात आला आहे. हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवरायांचा सर्वात उंचावरील पुतळा लडाखमधील पँगँग सरोवराजवळ उभारण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी लडाखमधील पँगाँग तलावाच्या काठावर 14,300 फूट उंचीवर असलेल्या या पुतळ्याचे अनावरण भारतीय लष्कराकडून करण्यात आले. मराठा सामाजाचा भगवा आता हिमालयाच्या पर्वतरागांतही फडकणार आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, महाराजाचां हा पुतळा पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायाचे प्रतिक आहे. हा पुतळा देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी, विशेषत: उत्तरेकडील सीमेवरील आव्हानात्मक भागात देशाचा अभिमान आणि सामर्थ्य दर्शवतो. छत्रपती शिवाजी महाराज हे लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहेत. देशभरात त्यांना मानणार तसेच त्यांचा आदर्श घेणारा मोठा वर्ग आहे. यादरम्यान भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा पुतळा चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेजवळ पँगॉन्ग तलावाच्या किनाऱ्यावर 14,300 फुट उंचीवर उभारण्यात आला आहे.
लष्कराच्या लेह येथील 14 कॉर्प्सने यासंबंधी माहिती दिली आहे. 14 कॉर्प्स (फायर अँड फ्यूरी कॉर्प्स)चे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी या पुतळ्याचे गुरूवारी (26 डिसेंबर) रोजी अनावरण केले.
पॅन्गॉन्ग सरोवर लेहच्या दक्षिण-पूर्व भागात 54 किलोमीटर अंतरावर आहे. हे सरोवर 14,270 फूट म्हजेच 4350 मीटर उंचावर स्थित आहे. पॅन्गॉन्ग सरोवराच्यामधूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जाते. भारत आणि चीनची नियंत्रण रेषा आहे. सरोवराचे पश्चिम भाग भारताच्या हद्दीत आहे तर पूर्वेकडील टोक चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये आहे. 1962 मध्ये चीन-भारत युद्धानंतर या क्षेत्राने अनेकदा संघर्ष पाहिला आहे. ऑगस्ट 2017मध्ये याच सरोवराच्या किनारी दोन्ही देशातील सैनिकांमध्ये चकमक झाली होती. मे 2020 मध्येही जवळपास 250 सैनिक एकमेकांना भिडले होते.
ऑगस्ट 2020 मध्ये, भारतीय सैन्याने तलावाच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या ठिकाणी ताबा मिळवला होता. यामध्ये रेजांग ला, रेक्विन ला, ब्लॅक टॉप, गुरुंग हिल, गोरखा हिल इत्यादींचा समावेश होता. मात्र नंतर लष्कराला डिसइंगेमेंटअंतर्गंत क्षेत्रावरील ताबा सोडावा लागला होता. आता शिवरायांचा पुतळा बसवण्यात आल्यानंतर हा एक प्रकारे चीनलाच इशारा आहे.