Spread the love

पुणे/महान कार्य वृत्तसेवा
‘कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दर वर्षी वाढ होत आहे. या सोहळ्यासाठी कायमस्वरूपी सुविधा करण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे,’ असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी दिले. ‘1 जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करावी, पोलिसांनी समन्वयाने चोख बंदोबस्त ठेवावा,’ अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत शिरसाट बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, समाजकल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाजकल्याण सहआयुक्त सुरेंद्र पवार, प्रमोद जाधव, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त विशाल लोंढे या वेळी उपस्थित होते.
शिरसाट म्हणाले, ‘कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला गेल्या काही वर्षांपासून अनुयायांची संख्या वाढत आहे. अनुयायांच्या सुविधांसंदर्भात दर वर्षी प्रशासनाला नियोजन करावे लागते. वाहनांसाठी जागा, मैदान, सपाटीकरण, पाणी, शौचालये आदी सुविधांचे नियोजन करण्यात येते. त्यासाठी मोठा खर्च होत असतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासकीय जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्या परिसरात शासकीय दवाखाना, विश्रांती कक्ष उभारण्याची गरज आहे. विजयस्तंभाच्या बाजूच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुटण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात चांगला वकील नेमून प्रयत्न करावा.’
‘सोहळ्यासाठी अनुयायांना शासनामार्फत आरोग्य सेवा देताना खासगी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलिसांवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी त्या ठिकाणी केलेल्या आपल्या सुविधांची आणि कामाची माहिती पोलिसांना, तसेच एकमेकांना उपलब्ध करून द्यावी. कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,’ असेही शिरसाट यांनी सांगितले.

  • दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त
  • जलद प्रतिसाद पथक, वायरलेस सुविधा
  • 278 एकर क्षेत्रावर 38 हजारांहून अधिक वाहनांसाठी 45 वाहनतळ
  • पिण्याच्या पाण्यासाठी 190 टँकर आणि चार भरणा केंद्र
  • 23 ठिकाणी आरोग्य पथके आणि 43 रुग्णवाहिका
  • दोन हजार 400 शौचालये, 275 कचराकुंड्या
  • ज्येष्ठांसाठी सात निवारा केंद्रे
  • सह्याद्री वाहिनीवर थेट प्रक्षेपण
  • पुस्तक विक्रीसाठी शंभर केंद्रस्थळ
  • महिलांसाठी स्वतंत्र नऊ हिरकणी कक्ष
  • पीएमपी बस सेवा