Spread the love

3 लाख 37 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
रेंदाळ येथील सराफाला तीन अनोळखी चोरट्यांनी बोरगांव-जंगमवाडी रोडवर धूम स्टाईलने लुबाडले. सराफाकडील सुमारे 3 लाख 37 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असलेली सॅक चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी शिवाजी दिनकर जाधव (वय 42 रा. मानेनगर रेंदाळ) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रेंदाळ येथील शिवाजी जाधव यांचा सोन्या-चांदीचा व्यवसाय असून त्यांचे घोसरवाड (ता. शिरोळ)  येथे जाधव ज्वेलर्स नांवाने दुकान आहे. ते दररोज रेंदाळ-घोसरवाड ये-जा करतात. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जाधव यांनी दुकान बंद केले व दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका सॅकमध्ये भरुन ते मोटरसायकलवरुन रेंदाळकडे निघाले होते. घोसरवाड-जंगमवाडी रोडवरील व्हाईट हाऊस बारच्या पुढे आले असताना अचानकपणे पाठीमागून एका दुचाकीवरुन तिघेजण आले व त्यांनी जाधव यांनी पाठीवर अडकविलेली सॅक हिसकावण्याचा प्रयत्न केला.  या झटापटीत जाधव हे मोटरसायकलीवरुन खाली पडले. त्यावेळी त्या चोरट्यांनी मारहाण करत व कोयत्याच्या उलट्या बाजूने मारत सॅक हिसकावून घेत पलायन केले. सॅकमध्ये 43 हजार 800 रुपयांचे गळ्यातील पेंडल, 18 हजाराच्या सोन्याच्या बाली, 12 हजाराच्या लहान अंगठ्या, 7500 रुपयांच्या अष्टपैलु लाखी, 9600 रुपयांच्या सोन्याच्या नथी, 4800 रुपयांच्या गळ्यातील बदाम,  1500 रुपयांच्या सोन्याया नथी, 1 लाख 26 हजाराचे चांदीचे पैंजण, 24 हजाराचे लहान मुलांचे कडल्या, 19 हजार 200 रुपयांच्या चांदीच्या 135 अंगठ्या, 43 हजाराचे चांदीचे 10 ब्रेसलेट, 16 हजाराचे चांदीचे लहान मुलांचे करदोडे असा 3 लाख 37 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.