नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी सायंकाळी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री 10 वाजता त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री आठच्या सुमारास त्यांना एम्सच्या (दिल्ली एम्स) आपत्कालिन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉ.मनमोहन सिंह हे 22 मे 2004 पासून 26 मे 2014 पर्यन्त भारताचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग हे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. राज्यसभेत त्यांनी आसामचे प्रतिनिधित्व केले होते. यापूर्वी इ.स. 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.
