मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
वक्फ बोर्डाकडून लातूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त शेतकर्यांना त्यांच्या जमिनीबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. लातूरमधील अहमदपूर येथील शेतकर्यांना नोटीस देण्यात आल्याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले. आता या प्रकरणावर एक ट्वीस्ट समोर आला आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
लातूर जिल्ह्यातल्या शेतकर्यांनी केलेल्या दाव्यानुसार, वक्फ बोर्डाकडून त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून शेती कसणार्या शेतकर्यांना वक्ङ्ग बोर्डाकडून नोटीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी काय म्हटले?
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी म्हटले की, वक्फ बोर्डाने तळेगावमधील शेतकर्यांना नोटीस पाठवून जमिनीवर दावा केला असल्याचे वृत्त समोर आले. हे वृत्त समोर आल्यानंतर आपण वक्फ बोर्डाच्या अधिकार्यांना या प्रकरणाची अधिक माहिती घेण्याचे निर्देश दिले. अधिकार्यांनी अधिक माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की, बाबू नावाच्या एका व्यक्तीने लवादाकडे जमिनीच्या दाव्याबाबत तक्रार दाखल केली आहे. लवादाकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शेतकर्यांना विचारणा करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाकडून लातूरच नव्हे तर राज्यातील कोणत्याही शेतकर्याच्या जमिनीवर दावा करणारी नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्टीकरण समीर काझी यांनी दिले.