दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला सर्वात मोठा महामार्ग आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे 1350 कि.मी. लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला टक्कर देण्यासाठी भारतात आणखी एक मोठा महामार्ग उभारला जात आहे. सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे हा भारतातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत देशभरातील 550 जिल्ह्यांमध्ये अंदाजे 65 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग आणि द्रुतगती मार्गाचे जाळे तयार केले जात आहे. यामध्ये, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग ठरला आहे. या महामार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. 1350 किमी लांबीचा हा मार्ग सात राज्यांना जोडणारा आहे. सध्या मध्यप्रदेशातील 245 किमी मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. देश-विदेशात दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाची चर्चा आहे. त्यातच आता भारतात दुसरा सर्वात लांब एक्सप्रेसवे उभारला जात आहे.
सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे हा 1271 कि.मी. लांबीचा भारतातील दुसर्या क्रमाकांचा मोठा महामार्ग बांधला जात आहे. या हायस्पीड महामार्गावर वाहने 120 किमी स्पीडने धावणार आहेत. भारताच्या दक्षिण टोकाला पश्चिमेशी जोडण्यासाठी हा महामार्ग उभारला जात आहे. विशेष म्हणजे भारताच्या दक्षिण टोकाला पश्चिमेशी जोडणार्या या महामार्गाचा कनेक्टींग पाईंट महाराष्ट्रात आहे. म्हणजेच सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेचा मध्यबिंदू महाराष्ट्रात आहे.
सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वे 6 राज्यांतील अनेक शहरांना चेन्नई आणि सुरतशी जोडणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून प्रवास करणार्या प्रवाशांना सुरत आणि चेन्नई या दोन शहरांशी थेट कनेक्टीव्ही मिळणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणरा आहे. सुरत-चेन्नई द्रुतगती मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे बांधला जात आहे. सध्या हा महामार्गावर फक्त 4 लेन तयार केले जाणार आहेत. भविष्यात ते 6 आणि नंतर 8 लेनपर्यंत वाढवले जाणार आहेत.