Spread the love

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि भारताचा मोठा शत्रू दहशतवादी मसूद अझहरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि ’जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरला हृदयविकाराचा झटका आला आहे. मसूद अझहर अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात लपून बसला होता. येथेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच त्याला उपचारासाठी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात नेण्यात आले. मसूद अझहरला कराचीतील संयुक्त लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
उपचारासाठी खास डॉक्टरांचे पथक रवाना
दहशतवादी मसूदच्या उपचारासाठी इस्लामाबादमधील हृदयरोगतज्ज्ञही कराचीला पोहोचत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दहशतवादी मौलाना मसूद अझहरला खोस्त प्रांतातील गोरबाज भागातून पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. त्याला लवकरच रावळपिंडीतील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज लष्करी रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने दहशतवादी मसूद अझहरला फक्त आश्रयच दिला नसून त्याला भारत विरोधी कारवायांसाठी मोकळं रानही दिले आहे. मसूद हा पाकिस्तानमध्ये स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षही चालवतो.