इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
घरात, व्यवहारात, जीवनात मराठी भाषा वापरणे आणि मराठी भाषेच अनुकरण करून ती समृध्द करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाचा स्मृतीजागर करताना शुद्ध मराठी बोलली, लिहिली गेली पाहिजे. त्यासाठी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुया, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकमार लवटे यांनी केले.
इचलकरंजीत 26 डिसेंबर 1974 मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपूर्तीच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत वस्त्रनगरीत त्याच्या स्मृती जागविण्यात आल्या. त्यानिमित्ताने डीकेटीई राजवाडा दरबार हॉलमध्ये आयोजित स्मृती जागर कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी गोविंदराव हायस्कूलच्या प्रांगणातून मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. मुख्य मार्गावरून ही दिंडी राजवाडा दरबार हॉलमध्ये पोहचल्यावर मुख्य कार्यक्रम सुरु झाला.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी साहित्यात शब्द कळायचे असतील तर लोकविचार कळला पाहिजे. भाषेचा संस्कार पांडित्याने येतो प्रचारानं नाही. आम्ही बोलतो मराठी, वागतो मराठी… हे कवितेत ठिक आहे. पण आपण तसं वागतो का ? असा प्रत्येकानं स्वत:ला विचारलं पाहिजे. सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनपूर्तीचं सुवर्ण महोत्सव खर्या अर्थानं साजरं करायचे असेल तर आपण व्यवहारात, घरात मराठी भाषेचा वापर करून भाषा समृद्ध करणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वागतपर मनोगतात शतकमहोत्सवी मराठी साहित्य संमेलन इचलकरंजीत होण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. आमदार राहुल आवाडे, डॉ. रमेश मर्दा यांनी सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनाच्या स्मृतींना उजाळा देत प्रत्येकाने मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, अशोक सौदत्तीकर, विजय जगताप, प्रसाद कुलकर्णी, पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, राजन मुठाणे, स्वानंद कुलकर्णी, वैशाली नाईकवडे,प्रा.शेखर शहा,सुनिल पाटील उपस्थित होते. एकुणच या कार्यक्रमातून सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनपूर्तीच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न झाला.