Spread the love

कोल्हापूर/भिकाजी कांबळे
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. ना. प्रकाश आबीटकर आणि ना. हसन मुश्रीफ यांच्यापैकी कोणाला पालकमंत्रीपद मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार असल्याने संख्याबळाच्या निकषावरच पालकमंत्रीपद देण्याचे निश्‍चित केले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले तीन अधिकृत आमदार तसेच एक खासदार आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये हे संख्याबळ जास्त आहे. याचा विचार केल्यास आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांना पालकमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून जर अनुभवाचा विचार केला तर ना. हसन मुश्रीफ यांच्याकडेही हे पद जावू शकते. मात्र, एकनाथ शिंदे पालकमंत्रीपदाची संधी सोडणार नाहीत. या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात फक्त प्रकाश आबीटकरच एकमेव आमदार होते. त्यामुळे पक्षवाढीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा प्रकाश आबीटकर यांना पालकमंत्रीपदावर विराजमान करून राधानगरी मतदार संघाला पहिला पालकमंत्री होण्याचा बहुमानही ते मिळवून देवू शकतात.
या जिल्ह्यात तीन मंत्री जरी असले तरी ना. चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदार संघातून निवडून आले आहेत. तसेच ना. हसन मुश्रीफ या दोघांनाही कोल्हापूर जिल्हा वगळून पालकमंत्रीपद मिळू शकते. सध्या राज्यातील 19 जिल्ह्यांना महायुतीने मंत्रीपदे दिली आहेत. अजून राज्यातील 16 जिल्हे मंत्रीपदापासून वंचित आहेत. त्यामुळे संख्याबळाचा निकष लावल्यास विजयाची हॅट्ट्रीक करून कॅबिनेट मंत्रीपद मिळविणार्‍या ना. प्रकाश आबीटकर यांना पालकमंत्री करून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्ह्याला सुखद धक्का देवू शकतात.