वैद्यकीय शिक्षण विभागाचा गलथान कारभार; विद्यार्थ्यांसह पालकही अस्वस्थ
कोल्हापूर/विठ्ठल बिरंजे
गतवर्षी वैद्यकीय शिक्षण (बीएएमएस) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्क परतावा देण्यास सरकारकडून टाळाटाळ सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसला आहे.
गतवर्षी आयुर्वेदिक मेडिकल अभ्यासक्रमासाठी (बीएएमएस) नोव्हेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडली. दुसर्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुर्ण शैक्षणिक शुल्क भरून घेवून जागा आरक्षित करण्यात आली. या फेरीतील बहुतांश विद्यार्थ्यांनी जिल्हा व जिल्ह्यानजीक जवळचे कॉलेज मिळविण्यासाठी तिसर्या फेरीत भाग घेतला. मात्र यातील बहुतांश विद्यार्थ्यांना संधी मिळालेली नाही. जवळचे कॉलेज मिळालेले नाही. त्यामुळे दुसर्या फेरीत आरक्षित केलेली जागा व महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित करावा लागला. यातील 50 टक्के फी सवलत सरकारकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, असे सांगण्यात आले. परंतू, 1 वर्ष पूर्ण झाले तरी शैक्षणिक शुल्क सवलतीची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये कमालीची अस्वथ्यता पसरली आहे.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय
ओबीसीसह अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यानंतर लगेच शैक्षणिक शुल्क सवलतीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क सवलतीची रक्कम अजूनही मिळालेली नाही.
व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड
अनेक पालकांनी पाल्याला डॉक्टर करण्याचे स्वप्न बघितले. यासाठी प्रवेश निश्चित व्हावा म्हणून खासगी सावकार, सोनेतारण करून संस्थेच्या नावाने पूर्ण शैक्षणिक शुल्कचा डीडी महाविद्यालयाकडे जमा केला. मात्र अद्याप यातील सवलतीचे शैक्षणिक शुल्क परत न मिळाल्यामुळे पालकांच्या डोक्यावर व्याजाचा डोंगर वाढत चालला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. विशेष लक्ष देवून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा विद्यार्थ्यांसह पालकांतून होत आहे.