Spread the love

ईडीकडून छापेमारी, भारतीय संस्थांचा रॅकेटमध्ये समावेश


मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडातील महाविद्यालयांद्वारे अमेरिकेत मानवी तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील काही संस्था कॅनेडातील महाविद्यालयांना हाताशी धरून भारतीय लोकांची अमेरिकेत तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई नागपूरसह देशभरातील अनेक संस्थांवर छापेमारी केली आहे. कॅनेडातील महाविद्यालयातून सुरू असलेल्या मानवी तस्करीत भारतातल्या अनेक संस्था गुंतलेल्या असाव्यात, असा संशय ईडीला आहे. याबाबत ईडीकडून तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
19 जानेवारी 2022 रोजी कॅनडा- अमेरिका सीमारेषा ओलांडताना चार भारतीयांचा अतिथंडीमुळे मृत्यू झाला होता. हे सगळेजण बेकायदेशीरपणे कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करत होते. याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी भावेश अशोकभाई पटेलसह इतर काही जणांवर मनी लाँडरींग अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पटेल आणि इतर आरोपींवर भारतीय लोकांना अवैध मार्गाने कॅनडाद्वारे अमेरिकेत पाठवण्यासाठी योजनाबद्ध कट रचल्याचा आरोप आहे.
या आरोपींनी अवैधपणे अमेरिकेला जाऊ इच्छिणार्‍यांकडून 50 ते 60 लाख घेतले होते. ज्यांना अमेरिकेत अवैधपणे जायचं आहे, त्यांची आधी कॅनडातील कॉलेजमध्ये प्रवेशाची व्यवस्था करायची. त्यासाठी आधी स्टुडंट विसा मिळवायचा आणि कॅनडात प्रवेश करायचा. पण कॅनडात गेल्यानंतर तिथे महाविद्यालयात प्रवेश घेण्याऐवजी त्यांना अवैध मार्गाने कॅनडा अमेरिकेची सीमा ओलांडायची, अशाप्रकारे हे रॅकेट काम करत असल्याचा संशय ईडीला आहे.
याप्रकरणी ईडीने 10 आणि 19 डिसेंबर रोजी मुंबई, नागपूर, गांधीनगर, वडोदरा येथील आठ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या संस्थांचा मानवी तस्करीत सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. त्यानुसार ईडी तपास करत आहेत.