राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप, काँग्रेसचाही पलटवार
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून आधीच वातावरण तापलेले असताना संसदेच्या मकरद्वारावर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत भाजपाचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जातेय. तर दुसरीकडं काँग्रेस नेते राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळं हा प्रकार घडल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय.
राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल : ओडिशाचे बालासोरचे खासदार प्रताप सारंगी आणि ङ्गर्रुखाबादचे भाजपा खासदार मुकेश राजपूत गुरुवारी (19 डिसेंबर) सकाळी संसदेच्या मकरद्वारावर झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसर्या खासदाराला धक्का मारल्यामुळं ते माझ्या अंगावर पडले आणि गंभीर जखमी झाल्याचा आरोप खासदार सारंगी यांनी केलाय. प्रताप सारंगी मीडियासमोर आले तेव्हा त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. या घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तसंच या प्रकरणी भाजपाने दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांच्यासह अनेक नेत्यांनी बाजू मांडली. भाजपाच्या शिष्टमंडळाने संसद पोलीस ठाण्यात जाऊन आपले म्हणणे मांडले आणि योग्य कारवाईची मागणी केली.
तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ’’आम्ही राहुल गांधींविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि चिथावणी दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांकडं तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत आज मकरद्वारच्या बाहेर घडलेल्या घटनेचा आम्ही तपशीलवार उल्लेख करण्यात आलाय. आम्ही कलम 109, 115, 117, 125, 131 आणि 351 अंतर्गत तक्रार दिली आहे. कलम 109 हत्येचा प्रयत्न आहे.’’
दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापयर्ंत तहकूब : या प्रकरणावरुन संसदेत झालेल्या गदारोळामुळं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज शुक्रवार 20 डिसेंबर सकाळी 11 वाजेपयर्ंत तहकूब करण्यात आलं आहे.
काँग्रेसकडून ओम बिर्ला यांना पत्र : काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, के सुरेश आणि मणिकम टागोर यांच्यासह काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आरोप केलाय की, इंडिया ब्लॉकच्या खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलय. एवढंच नाही तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाच्या तीन खासदारांनी धक्काबुक्की केली. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदारांनी असा दावा केलाय की, ते शांततेनं निषेध करत होते. त्यानंतर पायर्यांवरुन संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंदोलक खासदारांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. तसंच यावेळी राहुल गांधी यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या तीन खासदारांनी हल्ला केल्याचेही ते पत्रात म्हणालेत.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले? : यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणालेत, ’’डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे. त्यांनी भाजपाच्या खासदारांना इंडिया आघाडीच्या खासदारांचं शांततापूर्ण निदर्शने थांबवण्यास भाग पाडलेय. जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संसद, संविधान आणि लोकशाही यांच्याबद्दलची त्यांची दुर्दम्य इच्छा उघड होऊ नये. पण आम्ही ठाम राहू आणि बाबासाहेबांबद्दल निंदनीय टिप्पणी खपवून घेणार नाही. संपूर्ण देशातील सर्व जनता भाजपाआरएसएसला कडाडून विरोध करतील.’’