प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट होत असून, थंडीचा प्रभाव वाढला आहे. वातावरणात हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. ग्रामीण भागात झाडे, शेती व मोकळा परिसर असल्याने थंडीचे प्रमाण अधिक आहे. इचलकरंजीत बुधवारी किमान तापमान 12, तर कमल तापमान 19 अंश इतके नोंदवले गेले होते.
कडाक्याच्या थंडी पासून बचावासाठी नागरिक गरम कपडे आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत. यंदा दमदार पाऊस झाल्याने थंडीचा जोरही अधिक असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत थोडी थंडी पडायला सुरूवात झाली. डिसेंबर पासून पारा चांगलाच घसरला आहे. तापमानात घट झाली आहे. वातावरणात बदल झाल्याने गार वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांपासून गायब झालेली थंडी अचानक वाढल्याने याचा रब्बी पिकांना ङ्गायदा होणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. वातावरण बदलामुळे दमाग्रस्त रुग्णांना त्रास जाणवू लागला आहे. लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला यासह थंडी, तापाची लक्षणे दिसू लागली आहेत. आजारात भर पडली असून, या आठवड्याच्या सुरूवातीलाच पारा घसरला असून शीत लहरीसह हुडहुडी भरविणारी थंडी वाढली आहे. थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळच्या वेळी गार वारा वाहत असल्याने वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण जात आहे. सकाळी शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना तसेच पहाटे उठून कामावर जाणार्या मजूर वर्गांनाही थंडीचा त्रास जाणवत असल्याचे दिसून येत आहे.