Spread the love

गळतीशोधक मशीनसाठी निधीची आवश्यकता

इचलकरंजी/प्रवीण पवार

इचलकरंजी शहरातील जुन्या जलवाहिनीमध्ये अडकलेला कचरा शोधणे जमिनीखालील जुने व्हॉल्व शोधणे, जलवाहिनीच्या आकाराची माहिती घेणे, जलवाहिनीची सद्यस्थिती पाहणे अशा कामासाठी महानगरपालिकेच्या विभागाला कसरत करावी लागत होती. यावर उपाय म्हणून गळतीशोधक यंत्राद्वारे महापालिकेच्यावतीने प्रात्यक्षिक करण्यात आले. शहापूर येथील महालक्ष्मीनगरमध्ये कमी दाबाने येणार्‍या पाण्याच्या कारणाचा शोध घेताना जमिनीखालील व्हॉल्व अर्धा उघडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अशा यंत्राची इचलकरंजी महानगरपालिकेला गरज असून त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे जाळे पसरलेले आहे. 50 ते 60 वर्षापासूनच्या जुन्या जलवाहिनी शोधताना महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अनेक ठिकाणी जमिनीखाली गेलेले व्हॉल्व शोधणे, जलवाहिनीचा आकार पाहणे, अनेक वेळा जमिनीतील विविध ठिकाणी लागलेली गळती शोधणे अवघड होत होते. गळती काढताना अनेक वेळा गळती एकीकडे खुदाई दुसरीकडे होत होती. त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचार्‍यांनी केलेले परिश्रम वाया जाऊन आर्थिक नुकसान ही होताना दिसत होते.
यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने बुधवारी शहापूर येथील महालक्ष्मीनगरमध्ये कमी दाबाने पाणी येत असलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गळतीशोधक यंत्राद्वारे पाहणी केली. सदर गळतीशोधक यंत्राच्या साहाय्याने जलवाहिनीमध्ये असणारा जमिनीखालील व्हॉल्व अर्धवट उघडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संपूर्ण भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. सदर गतीशोधक यंत्राच्या साह्याने महालक्ष्मीनगरमधील अनेक दिवसाची कमी दाबाने येणार्‍या पाण्याची समस्या दूर झाली तसेच सदर जलवाहिनीची सद्यस्थिती पाहणी ही झाली. त्यामुळे अशा प्रकारचे मशीनची आवश्यकता महापालिकेला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने सदर यंत्र खरेदीच्या हालचाली सुरू केल्या असून आवश्यक असणार्‍या निधीसाठी प्रस्ताव ही तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.