जोतिबा/महान कार्य वृत्तसेवा
जोतिबा डोंगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ.डी.बी.पाटील यांना सी.पी.आर. रुग्णालयच्या एका पथकाने गर्भलिंग निदान चाचणीच्या एका प्रकरणात संशयित चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्याचा दवाखाना बंद करण्याचा आदेश दिला आहे.
कोल्हापूर येथील डॉ .डी .बी . पाटील हा गेल्या काही वर्षांपासून जोतिबा डोंगर येथे प्रतिक्षा क्लिनिक या नावाखाली एक दवाखाना चालवत आहे. कोल्हापूर येथे दीड महिन्यांपूर्वीच त्याने फुलेवाडी येथील तिस-या बस स्टॉपजवळ प्रतीक्षा क्लिनिक सुरू केले होते. या क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार खात्री करून पथकाने गुरुवारी सकाळी प्रतीक्षा क्लिनिकमध्ये छापा टाकला. यावेळी क्लिनिकमध्ये काही संशयास्पद औषधे सापडल्याची माहिती पथकातील वैद्यकीय अधिका-यांनी दिली. प्रतीक्षा क्लिनिकमधील कारवाईनंतर पथक जोतिबा डोंगर येथे गेले. यावेळी या पथकाने डॉ.डी.बी. पाटील याच्या जोतिबा डोंगर येथील दवाखान्यात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. याचबरोबर त्याच्या दवाखान्यातील औषधं आणि इतर वैद्यकीय साहित्य ताब्यात घेऊन दवाखाना बंद करण्याचा आदेश दिला आहे. पुढील चौकशीसाठी डॉ .डी बी पाटील याला कोल्हापूरला नेण्यात आले आहे. भविष्यात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. गर्भलिंग निदान चाचणीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.