बेळगाव/महान कार्य वृत्तसेवा
बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज बुधवारी उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अथणी येथील काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी करून आपल्या अकलेचे तारे तोडले. बेळगाव येथील सुवर्ण विधानसभेत येथे कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू आहे. त्यानुसार आज सभागृहामध्ये चर्चेला प्रारंभ झाल्यानंतर अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे असे वक्तव्य करून आपल्या अकलेच्या तारे तोडले.
मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे.
आमदार सवदी म्हणाले परवा महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असे वक्तव्य केले. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावून प्रश्न विचारला असता संबंधित नेत्याची मती भ्रष्ट झाल्याचे मी स्पष्टपणे सांगितले. या पद्धतीने जर कर्नाटकाचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे. कारण आमचे पूर्व मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे असे आपण म्हणू शकतो. कारण पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि ही बाब लक्षात घेता आमचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे वक्तव्य करून आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज स्वत:च्याच मती भ्रष्टतेची जणू प्रचिती दिली. एवढे बोलून न थांबता आमदार सवदी यांनी महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल तर ते त्यांना द्या आणि त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेले मुंबई कर्नाटकाला घ्या असा अजब सल्लाही दिला.
दरम्यान, बेळगाव-महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत असतात. या उलट बेळगाव सीमाभागाचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे, असा प्रस्ताव कर्नाटक शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावा अशा अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत केलेल्या अजब मागणीची पडसाद नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
आपल्या भागात अलमट्टी धरणातून पाणी सिंचन झाले पाहिजे
सभागृहात उत्तर कर्नाटकावर झालेल्या चर्चेप्रसंगी आमदार बसवराज पाटील -यत्नाळ यांनी अलमट्टी धरणाच्या पाणी सिंचनाचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या भागात अलमट्टी धरणातून पाणी सिंचन झाले पाहिजे तसे झाले तरच आमचा जगू शेतकरी जगू शकेल, असे नमूद केले. त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती, शिक्षण आणि परिवहन याबाबतीतील समस्या सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. बेळगावला कोट्यावधी रुपये खर्च करून सुवर्ण विधानसौधची इमारत उभारण्यात आली असली तरी अधिवेशनाचा काळ वगळता वर्षभर ही इमारत ओस मोकळी पडून असते. अधिवेशनासाठी दरवर्षी जवळपास 25 कोटी रुपये खर्च केले जातात तितकाच खर्च सुवर्णसौधच्या देखभालीसाठी होत असतो. हे लक्षात घेऊन या ठिकाणी राज्य पातळीवरील सरकारी कार्यालय स्थापन केली जावीत असे मग काही आमदारांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हास्तरीय कार्यालय या ठिकाणी स्थलांतरित करून काय ङ्गायदा होणार? असा सवालही त्या आमदारांनी केला. याखेरीज बेळगाव शहरातील उदयोन्मुख होतकरू खेळाडूंवर राज्यस्तरावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जावी त्यांच्यासाठी आधुनिक क्रीडा सुविधा आणि क्रीडांगण उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी देखील काही आमदारांनी केली. कल्याण कर्नाटकासाठी जसे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे तसेच बेळगावचा अंतर्भाव असलेल्या कित्तूर कर्नाटकासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमून दरवर्षी किमान 1000 कोटी रुपयांचे अनुदान दिले जावे, अशी मागणी बहुतांश आमदारांनी केली.