Spread the love

संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रात सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा म्हणून कोल्हापुर जिल्ह्याची ख्याती आहे. कोल्हापुरचा पालकमंत्री म्हणजे प्रति मुख्यमंत्री म्हणून मानला जातो. त्यामुळे पालकमंत्रीपद आपल्याच पक्षाला मिळावं यासाठी महाविकास आघाडी असो किंवा महायुती नेहमीच चढाओढ पहायला मिळालेली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे भक्कम सरकार राज्यात स्थापन झाले आणि कोल्हापूरातून शिवसेनेने आ. प्रकाश आबीटकर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावली. तर अपेक्षेप्रमाणे कागलचे आ. हसन मुश्रीफ यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. हा जिल्ह्याचा यथोचित सन्मान मानला जातो. परंतू, मंत्रीमंडळ विस्ताराचे सोपस्कार पार पाडल्यानंतर पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच होवू शकते. त्यामुळे कोल्हापुरच्या पालकत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर दिली जाते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. या विजयानंतर जिल्ह्यात कुणाकुणाला मंत्रीपद मिळणार याची चर्चा सुरु झाली. मुश्रीफ आणि आबिटकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली. मंत्री मंडळ विस्तारानंतर आता पालक मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.आता पहावे लागेल पालकमंत्रीपदाची धुरा कुणाकडे रहाते.


राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री पदाची धुरा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. जरी केसरकर पालकमंत्री असलेतरी त्यांच्या कामकाजाचे सर्व सोपस्कार जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्यामार्फतच पार पाडले जात होते. रवींद्र माने यांनी हा विश्‍वास सार्थ करून दाखविला होता. त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली आणि अजितदादा महायुतीत सहभागी झाले यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाचे खांदेपालट झाले. हसन मुश्रीफ कॅबीनेट मंत्री झाले आणि जागावाटपात पालकमंत्रीपद शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे गेले. आता राज्यात महायुतीचे भक्कम सरकार स्थापन झाले आहे आणि जिल्ह्यात आ. हसन मुश्रीफ आणि आ. प्रकाश आबीटकर दोघेही कॅबीनेट मंत्री झालेले आहेत. त्यामुळे शिवसेना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर पुन्हा दावा करू शकते. असे झाल्यास प्रकाश आबीटकरच जिल्ह्याचे पालकमंत्री होवू शकतात, असे एकंदरीत वातावरण आहे.