पेठवडगाव/महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्याच्या राजकारणात महायुती असो अगर महाविकास आघाडी यांच्यात संकटमोचक म्हणून परिचीत असलेले वारणेचे सावकार डॉ. आ. विनय कोरे यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. परंतू, भाजपकडून त्यांचा यथोचित सन्मान केला जावू शकतो, अशी दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दगाफटका करून तुतारी वाजविण्याच्या नादात पराभूत झालेेले हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असलेले राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद आ. डॉ. विनय कोरे यांच्याकडे सोपविले जावू शकते. कोरे हे राजकारणाबरोबरच सहकारातील भिष्माचार्य म्हणून मानले जातात. विशेष करून साखर धंद्यात त्यांचा असलेला अनुभव भाजपला यानिमित्ताने कामी येवू शकतो, असे मानले जात आहे. 1995 पासून ते महायुतीसोबत आहेत. किंबहूना त्यांचा स्वतंत्र पक्ष असलातरी त्यांनी राजकारणामध्ये कायमच भाजप आणि शिवसेनेला साथ देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद देवून त्यांचा यथोचित सन्मान होण्याची दाट शक्यता आहे. आ.विनय कोरे यांच्यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद निश्चितपणाने वाढलेली आहे. शाहूवाडी, पन्हाळा आणि हातकणंगले हे दोन विधानसभा मतदार संघ त्यांच्या ताकदीवर यश मिळालेले आहे. तसेच हातकणंगले लोकसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुतीचे धैर्यशील माने यांना विजयी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे या माध्यमातून त्यांना योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे.