Spread the love

विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा
कोणत्या परिस्थीती मंत्रीमंडळ विस्तारात नक्की स्थान मिळणार असा ठाम दावा करणार्‍या डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि राहूल आवाडे यांना मंत्रीमंडळ विस्तारात ठेंगा दाखवल्याने त्यांचा स्वप्नभंग झाला. आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दुसर्‍यांदा संसदेत पाठवल्याचे हे बक्षिस मिळाले, असा उपरोधात्मक सवाल त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रामाणिकपणे महायुतीसाठी काम केले. त्यांच्यामुळेच धैर्यशील माने खासदार झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याबदल्यात त्यांना मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. त्या फोल ठरल्या.

डॉ. कोरेंच्या योगदानाचा विसर
डॉ. विनय कोरे यांचे नाव तर संभाव्य पालकमंत्री म्हणून चर्चेत होते. शाहूवाडी- पन्हाळा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील- सरुडकर यांचे मताधिक्य कमी करण्यात कोरे यांनी जोडण्या लावल्या होत्या. तर गत 5 वर्षे त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्रीमंडळातील त्यांचे स्थान पक्के मानले जात होते. पण विस्तारावेळी त्यांचे नाव मागे पडले.

डॉ.यड्रावकरांचं काय चुकलं
महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेच्या कोठ्यातून डॉ. यड्रावकरांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र मागील आडीच वर्षात त्यांना मंत्रीपदासाठी झुलवत ठेवण्यात आले. राजकीय जीवन पणास लावून त्यांनी शिवसेनेला साथ दिली होती. त्यामुळे यंदा त्यांची प्रतिक्षा नक्की संपणार असे कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु त्यांना मंत्री मंडळात संधी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.

प्रकाश आवाडेंचे पाठबळ व्यर्थ
डॉ. राहूल आवडे नवखे असले तरी त्यांच्या घराण्याचा राजकीय प्रवास आणि कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे जाळे पहाता या भागात भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत करण्यासाठी भविष्यात त्यांचा उपयोग होईल आणि आवाडे यांना मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची धारणा होती. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आवाडे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जात होते. परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला. तर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी बंड करुन भाजपचा नंबर एक वर असलेला शत्रू पक्ष काँग्रेस इचलकरंजीतून हद्दपार केली. अपक्ष निवडून आल्यानंतर कोणात्याही पदाची अपेक्षा न धरता भाजपला साथ दिली होती. पण प्रकाश आवाडे यांनी भाजपाला केलेल्या या मदतीचा विसर पडल्याचे दिसून आले.