प्रवीण पवार/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती ते व्यक्त होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षाचालक, दुचाकी, टेम्पो, ट्रकचालक यांना गाडी चालविणे कठीण झाले आहे. जलवाहीनी टाकण्याच्या कामासाठी केलेल्या खुदाईमुळे रस्त्यांची चाळण झाली. रस्त्याची अवस्था ही पाणंद रस्त्यासारखी झाली आहे त्यामुळे वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
इचलकरंजी शहरांमध्ये आजपर्यंत रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे.महापालिका पॅचर्वकसाठी वर्षाला चार कोटी रुपयाचा निधी खर्च करतेआजपर्यंत या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही निरामय हॉस्पिटल ते आंबेडकर पुतळा या रस्त्याची अवस्था शेतातील पाणंद रस्त्यासारखीच आहे. पैसे खर्च होतात, मग रस्ता का होत नाही हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.
इचलकरंजी येथील महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा हा बाह्य वळण रस्ता आहे शहरातील गर्दीतून जाण्यापेक्षा या बाह्यवळण मार्गावरून जाण्यासाठी शहर व परिसरातील नागरिक या रस्त्याचा वर्षानुवर्षे वापर करत आहेत. हा रस्ता लोकांच्या नेहमीच्या रहदारीचा असून देखील प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेला आहे. जसा रस्ता तयार करण्यात आला आहे, तसा रस्ता दुरुस्त करण्यात आला नसल्याचे नागरिक सांगतात. त्यातच कृष्णापानी योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता खुदाई करण्यात आला होता. रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित न मुजवल्यामुळे रस्ता पूर्ण खराब झाला आहे या रस्त्यावर गावभाग पोलीस ठाणे ते निरामय हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावर खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी सध्याची अवस्था आहे. ते बघून हाच काय शहराचा विकास, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.रस्त्यावर डांबराचा थर अजिबात शिल्लक नाही. पूर्णपणे रस्ता उखडलेला असून खड्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत. सदरचा डांबरी रस्ता उखडून १० इंचापासून ते ४ फुटांपर्यंत खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे लहान-मोठ्या दुर्घंटनांना विनासायास आमंत्रण मिळू लागले आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा व बांधकाम विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रशासनाने डोळेझाकपणाची भूमिका सोडून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, खड्डेमुक्तरस्ते ही मोहीम राबवावी, शहरवासियांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.