नृसिंहवाडी : महान कार्य वृत्तसेवा
शनिवारी होणाऱ्या दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी येथे भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. गुरुवारीपासूनच दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून मंदिर परिसर भक्तिभावाने फुलला आहे. दत्त भक्तांच्या दिगंबरा दिगंबरा जयघोषाने सारा परिसर दुमदुमत आहे.
गुरुवारी सकाळपासूनच दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिर परिसरात “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. भाविकांसाठी दर्शन सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सोयी करण्यात आल्या होत्या. रांगेत उभ्या असलेल्या भक्तांसाठी सावलीची व्यवस्था केली आहे तसेच पार्किंगची व्यवस्था नेटकी करण्यात आली आहे. मंदिरासमोरील परिसरात अनेक भक्त ग्रंथ वाचन, पोथी वाचन, भजन आणि ध्यान यामध्ये तल्लीन झाले होते. भक्तिभावाने भारलेले वातावरण पाहून दत्त भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दिवसभर नृसिंहवाडी येथे भाविकांच्या येण्या-जाण्याची वर्दळ कायम होती.
दत्त जयंतीच्या निमित्ताने नृसिंहवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी मंदिरात विशेष पूजेचा कार्यक्रम पार पडला. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली गेली होती. शनिवारी होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरातून भक्त नृसिंहवाडीत येण्याची शक्यता आहे. दत्त भक्तांसाठी हा पर्वणीचा क्षण असून मंदिर परिसरात एकीकडे भक्तगणांची गर्दी, दुसरीकडे अध्यात्मिक व धार्मिक वातावरणाची अनुभूती प्रत्येकालाच भुरळ घालत आहे.
नृसिंहवाडी ही दत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. त्यामुळे येथे होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. दत्त भक्तांना या उत्सवातून अध्यात्मिक ऊर्जा आणि समाधान मिळत असल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत.