Spread the love

पेठवडगाव/महान कार्य वृत्तसेवा
पंचगंगेपाठोपाठ आता वारणा नदीलाही प्रदूषणाचा फार्स आवळत चालला आहे. काही साखर कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी थेट वारणा नदीत सोडले जात असल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचा खच दिसू लागला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे गुरूवारी जयशिवराय किसान संघटना आक्रमक होत प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण कार्यालयावर हल्लाबोल केला. अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत संबंधित कारखान्यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केली. 17 डिसेंबरपर्यंत कारवाई न केल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून वाहणार्‍या वारणा नदीचे पाणी गेले 8 दिवसांपासून दुषित झाले आहे. मासे मेले आहेत तर भल्या मोठ्या मगरीही दुषित पाण्यामुळे मृत झालेल्या आहेत. प्रत्येक वर्षी असे दुषित पाणी सोडून कारखानदार नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. सध्या आलेल्या दुषित पाण्यामुळे वारणा नदीकाठावरील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये प्रचंड रोगराई वाढली आहे. जलचर प्राण्यांसह शेतकर्‍यांची पाळीव जनावरे पशु, पक्षी देखील दुषित पाण्यामुळे रोगराईस बळी पडत आहेत. वारणा नदीकाठावरील अनेक गावातील नागरिक आजारी पडून त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. या दुषित पाण्यामुळे पर्यावरणाचीही हानी होत आहे. तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. जे साखर कारखाने वारणा नदीत दुषित पाणी सोडत आहेत त्यांच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकावर तात्काळ फौजदारी दाखल करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.
जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात सदाशिवराव कुलकर्णी, महादेव धनवडे, बाळकृष्ण पाटील, सुभाष सुतार, राजेंद्र हेरवाडे, शितल कांबळे, तानाजी माने, विकास माने, गब्बर पाटील, उत्तम पाटील, गुंडू दळवी, केशव राऊत, शंकर बोरचाटे यांचा समावेश होता.