विधानसभेचा निकाल आणि पुढील राजकीय दिशा चर्चासत्रात विचारवंतांचे मत
प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला नव्हता. कारण महाआघाडीपेक्षा महायुतीला फक्त अर्धा टक्के मते कमी होती.पण तरीही महाआघाडी विजयाच्या भ्रमात राहून आपण सत्तेवर येणारच हे गृहीत धरून अगदी मुख्यमंत्रीपदाचीही जाहीर चर्चा करू लागली होती. पण लोकसभेतील निकालापासून धडा घेऊन महायुतीने अतिशय विचारपूर्वक व्यूहरचना केली. परिणामी लोकसभा ते विधानसभा या अवघ्या चार महिन्यात महायुतीच्या मतांमध्ये चौदा टक्के मतांमध्ये वाढ झाली. अशी वाढ ही निवडणुकीतील क्रांतिकारी बाब आहे. तसेच लोकसभेपेक्षा विधानसभेला पाच टक्के मतदारही वाढले होते. महायुती जशी एकसंघपणाने लढली तो एकसंघपणा आघाडीत दिसत नव्हता. अंतरविसंगतीने भरलेल्या समाजाला संघटित करण्यात महायुतीला यश आले. भाजपा सलग तीन तिसऱ्यांदा महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरणे आणि यावेळी तर स्वतंत्रपणे बहुमताच्या अगदी जवळ जाणे हे निश्चितपणे मोठे यश आहे. भाजप पुढे काँग्रेसला टिकायचे असेल तर त्यांना नवा अजेंडा घ्यावा लागेल. राजकीय, सामाजिक , सांस्कृतिक प्रश्नांची सखोल मांडणी करावी लागेल. आपले सामर्थ्य काय आहे आणि राजकारण कसं केलं पाहिजे याचे भान काँग्रेसला राहिले नाही. मात्र भाजपने निवडणूक जिंकण्याचे स्वतःचे तंत्र विकसित केले आहे. आणि ते प्रभावीपणे ते काम करते आहे असे मत ” विधानसभा निवडणुकीचा निकाल व राजकारणाची पुढील दिशा “या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ.प्रकाश पवार आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर हे प्रमुख वक्ते होते. तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ.अशोक चौसाळकर होते. प्रा. रमेश लवटे आणि स्वागत तर प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. दशरथ पारेकर यांना ‘पीएचडी ‘पदवी मिळाल्याबद्दल डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते त्यांचा शाल ,ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजवादी प्रबोधिनीचे बेडकिहाळचे ज्येष्ठ कार्यकर्ते एम.एस. चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली.
या चर्चासत्रात बोलताना डॉ. दशरथ पारेकर म्हणाले, एवढा अनपेक्षित निकाल अपेक्षित नव्हता. एक प्रकारचे संशयास्पद वातावरण आहे हे खरे आहे. राजकारणामध्ये एक सुप्त भीती वावरते आहे.. मताधिकार किती मोकळेपणाने बजावला हाही प्रश्न आहे. सर्वच पक्ष तत्वच्युत झाले आहेत हे लक्षात घेऊन सामान्य माणसांनी बोध घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा भाजपला काडीमात्र ही धोका नाही. मात्र त्यांना गाफीलही राहता येणार नाही. सरकार स्थिर असेल पण तिजोरीत खडखडाट आहे हे वास्तव आहे.कर्जाचा डोंगर असताना विकास कसा होणार हा प्रश्न आहे.सरकार स्थिर असले तरी विकास, बेरोजगारी, शेतमालाला भाव, शिक्षण ,आरोग्य अशा विविध क्षेत्रात काम कसे करणार हे पहावे लागेल. वंचित व मनसेची अवस्था बघता प्रादेशिक पक्ष नगण्य ठरले आहेत. तसेच तसेच या निवडणुकीतील उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी फार मोठी आहे. तसेच कोट्याधीश , अब्जाधीश मंडळी आता निवडणूक लढवू शकतील असे चित्र निर्माण झाले आहे.
प्रा. डॉ. प्रकाश पवार म्हणाले, मराठा, ओबीसीसह सर्वांना मत देण्याला भाग पाडण्याची व्यूहरचना करण्याची ताकद भाजपने सिद्ध केली. जातीय अस्मिता बाजूला पडून हिंदुत्वाची अस्मिता पुढे आली. त्यात बिल्डर लॉबीपासून सर्वांनी मोठी भागीदारी केली. हिंदुत्व नावाची गोष्ट भाजपने प्रचंड ऍक्टिव्हेट केली. यशवंतराव चव्हाण यांचे प्रारूप आणि शरद पवार यांचे राजकारण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भाजपचे राजकारण उभे राहू शकत नाही हे पटवून देण्याची एक सूत्रबद्ध मांडणी भाजपने केली. त्यासाठी देशभरातील संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोठी कामगिरी केली. देवेंद्र फडणवीस यांची बौद्धिक कसरत आणि सूक्ष्म नियोजन या विजयातून दिसून आले. ओबीसी व मराठा यांचे परस्परविरोधी राजकारण त्यांनी जाणीवपूर्वक चालू दिले पण ही मते आपल्याकडेच येतील याची दक्षता त्यांनी घेतली. नवश्रीमंत वर्ग, लाडकी बहीण सारख्या योजना, वारकऱ्यांपासून सत्संगापर्यंतच्या सर्व संघटनांचे राजकीयकरण करण्यात भाजप यशस्वी ठरला. महाराष्ट्राची समाजव्यवस्था व तिचे ताणेबाणे बदलले आहेत. परिवर्तन आणि समतेचा नवा अजेंडा घेऊनच काँग्रेससह इतरांना पुढे जावे लागेल. असा संदेश या निकालाने दिला आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले, या निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत उद्धव ठाकरे गटाची सात टक्के मते घटली ,काँग्रेसची चार टक्के मते घडली. भाजपची आहे तीच सव्वीस टक्के मध्ये कायम राहिली. पण अजित पवारांची मते सात टक्के वाढली. आज महाराष्ट्रात शहरी मतदारांचे प्रमाण एक्कावन्न टक्के आहे. मराठी भाषिकांचे प्रमाण ७२ वरून ६६ टक्के वर घटलेले आहे. तिस टक्के मतदार हा मध्यमवर्गीय आहे. हे सारे आपण लक्षात घेतले पाहिजे. गेल्या वीस वर्षात आघाडीच्या राजकारणाने काँग्रेस आकसत गेलेली आहे. पण तरीही काँग्रेसचा म्हणून मध्यममार्गी मतदार आजही आहे. उद्धव ठाकरे गट अर्थात मूळ शिवसेना हा महाविकास आघाडीचा नैसर्गिक घटक नाही हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारणामध्ये बदल होत असतात. तसेच विशिष्ट समूहाला वगळण्याचे राजकारण फार काळ टिकू शकत नाही हेही खरे आहे. या निवडणुकीत खरा लाभ अजित पवार यांना झाला आहे. पण लोकमत बदलत असते हा भारतीय लोकशाहीचा अनुभव आहे.
या चर्चासत्रातील तीनही वक्त्यांनी या निवडणूक निकालाचे आणि राजकारणाच्या पुढील दिशेचे अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. तसेच श्रोत्यांच्या शंकांना उत्तरेही दिली. या चर्चासत्रास जयकुमार कोले, भरमा कांबळे ,रामदास कोळी, किरण कटके , संदीपचोडणकर,पांडुरंग पिसे, शिवाजी साळुंखे ,डॉ. पूजा रुईकर, अशोक केसरकर, महेंद्र जाधव ,अजित मिणेकर सदा मलाबादे,एम.के. पाटील ,सचिन पाटोळे, शकील मुल्ला ,सुनील बारवाडे,दीपक पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अन्वर पटेल यांनी आभार मानले.