Spread the love

कबनूर/महान कार्य वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक 5 मधील डॉ.आंबेडकर चौक येथून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला ,एका खाजगी मालकाने आपल्या जागेत मातीचा बांध घातल्याने,गटारीचे सांडपाणी दलित वस्तीमध्ये थेट नागरिकांच्या घरात घुसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्षानुवर्षे गावातील सांडपाणी नैसर्गिक पद्धतीने येथील हराटी परिसरात येते. मात्र सध्या येथील एका जागा मालकाने त्याच्या जागेत बांध घातल्याने सदर पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले आहे. यापूर्वी अनेकदा ग्रामपंचायतीने हा प्रश्न सोडवण्याचे केवळ आश्वासन दिल्याने नागरिकांच्या घरात गटारीचे पाणी जायची वेळ आली आहे.

प्रभाग क्रमांक पाच मधील सदरच्या वार्डामध्ये एक माजी व आजी सरपंच निवडून आले आहेत.त्यांच्याच प्रभागातील नागरिकांना गटारीच्या सांडपाण्याचा सामना करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सांडपाणी घरात घुसल्यानंतर नागरिकांनी थेट सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ टाकून संताप व्यक्त केला.यानंतर सरपंच, ग्रामविकास अधिकारी,उपसरपंच यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान ग्रामपंचायतीने लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.