हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
नरंदे (ता. हातकणंगले) येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटीने गट नं. 218 मधील 10 हजार चौ.फुट जागा बेकायदेशीर बळकावली असून सध्या याठिकाणी बंदिस्त हॉल व संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. हे बेकायदेशीर बांधकाम थांबविण्यात यावे आणि झालेले बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी करत नरंदे ग्रामस्थांनी बुधवारी हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थ भलतेच आक्रमक झाले होते. दरम्यान, संस्थेचे संचालक हर्षवर्धन देशमुख, नमिता देशमुख व चेअरमन प्रतापराव देशमुख यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार सरपंच पुजा कुरणे यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली. या प्रकरणात तहसिलदार आणि पोलीसांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीदरम्यान संस्थेने बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये व्यापक बैठक होवून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा टोकाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू, माजी पंचायत समिती सदस्य राजू भोसले यांनी यासंदर्भात योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर निर्णय मागे घेतला. यापूर्वीही ग्रामस्थांनी वरिष्ठ कार्यालयाकडे या बांधकामसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण राजकीय बळाचा वापर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या पुन्हा बांधकाम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि सरपंच कुरणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून या प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात समन्वयाने तोडगा काढू, असे आश्वासन मोर्चेकरांना देण्यात आले.
या संदर्भात लवकरच तोडगा काढणार
मोर्चानंतर आ. अशोकराव माने यांनी तमदलगे येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीवर बैठक घेतली. अधिकारी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. या संदर्भात लवकरच व्यापक बैठक घेवून मार्ग काढू, शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन आ. माने यांनी दिले. बैठकीला तहसिलदार सुशिलकुमार बेलेकर, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले, नरंदेचे माजी सरपंच अनुसे उपस्थित होते.