इचलकरंजी/प्रविण पवार
महापालिका स्थापन झाल्यानंतर आयुक्त, उपायुक्तांसह सर्व विभागप्रमुखांची दालनं टकाटक करण्यात आली. परंतू, महापालिकेच्या इमारतीत विविध विभागात असलेले फर्निचर मात्र बदलण्यात तसदी घेतलेली नाही. गेल्या 20 वर्षांपासून महत्वाचे दस्तऐवजांसाठी जुनी व भंगार झालेली लाकडी कपाटे वापरात आहेत. सध्या या फर्निचरला मोठ्या प्रमाणात वाळवी लागल्यामुळे महत्वाच्या दस्तऐवजांना धोका निर्माण झाला आहे. तातडीने हे फर्निचर न बदलल्यास इचलकरंजीकरांचा महत्वाचा ठेवा नष्ट होवू शकतो. दरम्यान, दोन दिवसांपासून वाळवी लागल्याचे लक्षात आल्यानंतर घाईगडबडीने फर्निचरवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून औषध फवारणीचे काम सुरू केले आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेतील दालन क्र. 20 मध्ये अनेक वर्षापासून एक खिडकी योजनेचे कार्यालय होते. महापालिकेमधील येणारे अर्ज, जन्ममृत्यु नोंदणी यासह अन्य कागदपत्रांचाही या दालनांमध्ये साठा होता. सध्या महापालिकेने अत्याधुनिक असे कॉमन फॅसिलिटी सेंटर उभा केले आहे. त्यामुळे एक खिडकी योजनेचे कार्यालय रिकामे झाले आहे. या दालनाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने दालनामध्ये असणारे फर्निचर इतरत्र हलवताना दालनातील सर्वच फर्निचरला वाळवी लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सदर दालनामधील सर्व फर्निचर बाहेर काढत वाळवी प्रतिबंधक औषधाने संपूर्ण दालन वाळवी मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दालनामध्ये महत्त्वाचे दस्तऐवज होते. परंतू, सुदैवाने कोणत्याही दस्तऐवजाला वाळवी लागल्याचे निदर्शनास आले नाही. परंतू, या दालनामध्ये मोठ्या प्रमाणात वाळवी लागली असल्याने महानगरपालिकेतील सर्वच दालनामधील फर्निचर व कागदपत्रांची पाहणी करून वेळीच वाळवी प्रतिबंधक औषध फवारणी करून घेणे गरजेचे बनले आहे. वाळवीमुळे फर्निचरसाठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता असून सर्वच विभागातील अनेक महत्त्वाचे दस्तऐवज नष्ट होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे एक खिडकी योजनेच्या दालनामधील बाहेर काढलेले फर्निचरही नष्ट करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून बाहेर काढलेल्या फर्निचरमधील वाळवी इतरत्र पसरून संपूर्ण इमारतीला मोठा धोका निर्माण होणार नाही.
एक खिडकी योजनेच्या कार्यालयातील फर्निचरला वाळवी लागल्याचे निदर्शनास येताच वाळवी प्रतिबंधक औषधाची फवारणी केली असून महापालिकेतील इतर कार्यालयात कोठे वाळवी आढळून येते का? याची तपासणी करण्यात येणार असून तशी वाळवी आढळल्यास वेळीच उपाययोजना केली जाईल.
-महेंद्र क्षीरसागर,
अभियंता, बांधकाम विभाग