इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरातील पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती करण्यासाठी खासगी ठेकेदार नेमला आहे. परंतू, त्या ठेकेदाराने केवळ दोनच कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे 17 हजार पथदिवे देखभाल, दुरूस्तीचा भार जीव धोक्यात घालून हे कर्मचारी करत आहेत. संबंधित ठेकेदाराने महापालिकेची या प्रकरणात फसवणूक केली आहे. त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी. कोणतीही ‘अर्थपूर्ण’ चर्चा न करता त्याला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे.
संबंधित मक्तेदाराने देखभाल दुरुस्तीसाठी 4 कर्मचारी नेमण्याची तरतूद आहे. महापालिका प्रशासनाने पहाणी केली असता मक्तेदाराने दोनच कर्मचारी लावले असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित मक्तेदारास सक्त ताकीद दिली होती. त्यानुसार मक्तेदाराने 4 कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कमी कर्मचारी लावले. याबाबतचा अहवाल कारवाईसाठी वरिष्ठाकडे पाठवून दिल्याचे प्रभारी विद्युत अभियंता अभय शिरोलीकर यांनी सांगितले आहे.
इचलकरंजी शहरातील पथदिवे व हायमास्ट दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने मक्तेदाराची नियुक्ती केली आहे. सदर मक्तेदाराने देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसे कर्मचारी नेमले नाहीत. शहरातील सुमारे 17 हजार पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी फक्त दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे नादुरुस्त पथदिव्यांच्या तक्रारीचे निरसन व दुरुस्ती होण्यासाठी सुमारे महिनाभर दिरंगाई होत आहे. बंद असणार्या पथदिव्यांमुळे शहरामध्ये ठिकठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याचाच फायदा घेवून शहरामध्ये चोरी घरफोड्यासारख्या अनुचित घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित मक्तेदाराची कामाबाबतची चौकशी होऊन त्याने जेवढे काम केले आहे, तेवढ्या कामाचेच देयके अदा करावी, असे दाभोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दुकान गाळ्याचा बेकायदेशीर वापर
संबंधित मक्तेदाराकडून महानगरपालिकेचा गाळयाचा गोडावूनसाठी बेकायदेशीरपणे वापर सुरू आहे. दुकान गाळ्याबाबत महापालिकेने चौकशी करावी व संबंधित मक्तेदाराकडून संपूर्ण भाडे वसूल करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दाभोळे यांनी यावेळी दिला.