Spread the love

कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्यातून गेल्या आठ दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. सध्या थंडीची तीव्रता कमी असलीतरी नजीकच्या 2-4 दिवसात पारा आणखी खाली उतरेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात 4 दिवस ढगाळ वातावरण होते. 2 दिवसांपूर्वी विजेचा कडकडाट होवून पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे थंडी गुल झाली होती. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस हा रब्बी हंगामाच्या पिकांना पोषक असल्याने रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, खपली ही पिके तरारली होती. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत होते. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी उसतोडी खोळंबल्या होत्या. चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती. मात्र आता हे वादळ गेल्याने थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान 20 ते 22 अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे काही दिवस उकाडा जाणवत होता. मात्र आता पुन्हा तापमान घसरू लागल्याने थंडी परत आली आहे. रविवारपासून तापमान अचानक घसरले. ही स्थिती आणखीन आठ दिवस राहण्याची शक्यता आहे.