अर्जुनवाड/महान कार्य वृत्तसेवा
कृष्णा नदीच्या पाण्याला हिरवा रंग आला असून अर्जूनवाडला याच दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गेली आठ दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत असून गावात साथीच्या आजारांचा धोका गडद होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. येथून जवळच असलेल्या कृष्णा नदीपात्रातून गावाला पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. वारणे पासून शिरोळपर्यंतचे सर्व साखर कारखाने सध्या सुरु झालेले आहेत. त्यामुळे कारखान्यातल रसायन मळी मिश्रीत पाणी विना प्रक्रीया कृष्णा नदीत सोडले जात असावे त्यातून नदीतील पाण्याला हिरवा रंग चढला असावा अशी शंका या निमित्ताने व्यक्त होत आहे. परंतु ग्रामपंचयातीच्या कारभार्यांनीही ही बाब गांभिर्याने घेतलेली दिसत नाही. याच हिरवट पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जात आहे. पाणी योजनेवर प्रक्रीया करण्यासाठी फिल्टर हाउस आहे. प्रत्येक सोमवारी स्वच्छतेसाठी पाणी उपसा बंद ठेवला जातो. जर फिल्टर हाउसची नियमीत साफसफाई होत असेल तर पाणी हिरवेगार येतेच कसे असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. गेले काही महिन्यांपासून पाण्याची टाकी व फिल्टर स्वच्छ केले जात नसावे, अशी शंंकाही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कामगार वरचड
गावचा कारभार महीला सरपंच चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे कर्मचार्यांची मनमानी सुरु आहे. कोणाचा ताळमेळ कोणाला लागत नाही. याकडे आता नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पाणी विकत घेण्याची वेळ
अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने नियमीत पाणी पट्टी भरुनही ग्रामस्थांना विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावकर्यांवर पाण्याचा अतिरिक्त भार पडत आहे.