Spread the love

दोघे हल्लेखोर ताब्यात : दोघेही संशयित हल्लेखोर अल्पवयीन
मिरज/महान कार्य वृत्तसेवा

सांगलीतील हरिपूर रोडवर सूरज अलिसाब सिदनाथ या हॉटेल वेटरचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या हॉटेल कामगारांवर दोघा हल्लेखोरांनी तब्बल 22 वार करीत त्याची निर्घृण हत्या केली. प्रथम दर्शनी अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले असले तरी खुनाचा प्रकार पाहता यामागचे कारण वेगळे असण्याची शक्यता आहे. या घटनेत मयत सूरज याच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर, खांद्यावर, पोटावर, पाठीवर धारदार हत्याराचे 22 वार करण्यात आले आहेत. सदर खुनाची घटना सांगली-हरिपूर रस्त्यावर तेलंगकृपा बंगल्यासमोर रात्री 11 च्या सुमारास घडली. घटनास्थळी मयत सुरजची दुचाकी आणि मोबाईलही सापडला आहे. मयत सूरज हा हरिपूर येथील संगम हॉटेल येथे वेटर काम करत होता. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगुलेसह वरिष्ठ पोलीस अधिकर्‍यांनी भेट दिली. या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक स्वामी आणि पीएसआय दीपक गायकवाड यांनी यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून दोघेही संशयित हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे.