Spread the love

नांदणी /महान कार्य वृत्तसेवा
नांदणी-हरोली मार्गावरील ओढ्यावरील पुलावर संरक्षण कठडा उभारण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे. या पुलाच्या रचनेमुळे अनेक वाहनचालक आणि पादचारी अपघाताच्या धोक्यात आहेत. सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना, पुलावर योग्य तो सुरक्षा उपाय करण्यात यावा अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
या पुलाची उंची रस्त्याच्या तुलनेत कमी असून रस्ता वरच्या बाजूला आहे. यामुळे पुलावरून जाताना वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या ठिकाणी वाहनांच्या चुकीच्या मोजमापामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. याशिवाय पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झुडपे आणि झाडेझुडपे वाढली असून, पुलाजवळ बाबूच्या झाडाचे मोठे बेट असल्यामुळे रस्ता अधिक अरुंद झाला आहे. परिणामी, वाहनांना योग्य मार्ग दिसण्यात अडचण येते.
सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, या पुलावर मजबूत आणि उंच संरक्षण कठडा बांधून त्यावर स्पष्ट दिशादर्शक लावण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. यामुळे अपघात टाळता येतील आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल. तसेच पुलाजवळील झुडपे काढून रस्ता प्रशस्त करण्यात यावा, अशीही मागणी होत आहे.
या बाबतीत संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून योग्य ती सुरक्षा सुविधा पुरवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. रस्ता रुंदीकरणासोबतच पुलाच्या संरचनेत सुधारणा केल्यास अपघात टाळता येईल व नागरिकांचा प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा आहे.