xr:d:DAF7_VMqzQ4:2,j:1819872051236850602,t:24020605
Spread the love

कोल्हापूर/संतोष पाटील

आशिया खंडात नावाजलेल्या शेतकरी संघातील कारभार्‍यांच्या मनमानीमुळे संघाचा बैल गाळात अधिकच रूतत चालला आहे. संघाच्या पेट्रोल पंपावर विक्रीसाठी खरेदी केलेले 40 लाखाचे लुब्रीकेन ऑईल केवळ 20 लाखाला विकल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा विषय संचालक मंडळासमोर न आणताच परस्पर कारभार केला आहे. या घोटाळ्यातून कुणाचा खिसा भरला असा संतप्त सवाल संघाच्या वर्तुळात विचारला जात आहे. दरम्यान, 11 डिसेंबर रोजी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भात याचा पोलखोल होण्याची शक्यता आहे.

चेअरमनांच्या गाडीवर महिन्याला 40 हजारांचा खर्च
युवराज पाटील यांच्या कारकिर्दीत चेअरमन यांच्यासाठी 4 चाकी गाडी खरेदी केली होती. चेअरमन यांना विविध शाखांना भेटी देण्यासाठी सोयीचे व्हावे असा या गाडी खरेदी मागचा उदात्त हेतू होता. पण सध्याचे चेअरमन गाडीचा वापर करतात मात्र ही गाडी कुठल्या शाखेला कितीवेळा भेटी दिल्या याबाबत संचालक मंडळच अनभिज्ञ आहे. मग या गाडीवर महिन्याला 40 हजारांचा खर्च कशाला करायचा? असा मुद्दाही बैठकीत चर्चेला आल्याचे कळते.


कोल्हापूरचा शेतकरी संघ आणि त्याची उत्पादने जगभर नावाजली गेली. जुन्या जाणत्या कारभार्‍यांनी अतिशय नेटाने संघ चालविला. कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत संघाच्या स्थावर मालमत्तावरून संघ बळकट केला. परंतू, अलिकडच्या काळात स्वार्थी राजकारण्यांचा संघात शिरकाव झाल्याने संघाचा बैल अक्षरश: खिळखिळा करून ठेवला आहे. मागील 4-5 वर्षात संघातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. संघातील खत घोटाळा, गरज नसताना रूकडी खत कारखान्याची दुरूस्ती त्याचबरोबर पेट्रोल पंपावरील रोख शिल्लक, मसाला घोटाळा असे अनेक प्रकार उजेडात आले. मागील कारभार्‍यांनी संघाच्या मालमत्तांचा ताबा सोडून विक्रीचा धडाका लावला होता. यातून प्रचंड माया गोळा केली. हाच कित्ता सध्याचे कारभारी गिरवताना दिसत आहेत. कोल्हापूर ते मुंबई येथे संघाचे अनेक पेट्रोल पंप आहेत. या पंपावर विक्रीसाठी 40 लाखांचे लुब्रीकेन ऑईल खरेदी करण्यात आले होते. परंतू, उठाव नसल्याचे कारण पुढे करीत 50 टक्के कमी दराने म्हणजे 20 लाखाला विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात नुकतीच काही संचालकांची शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे समजते. असा मनमानी कारभार सध्या संघात सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे नेत्यांनीही साफ दुर्लक्ष केल्याची नाराजीही संचालकांनी बोलून दाखविल्याचे कळते.