कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
शिवसेनेचे स्टार प्रचारक आणि खासदार धैर्यशील माने यांचा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून लवकरच मोठा सन्मान होणार आहे. राज्यात महायुतीचे पुर्ण बहुमताने सरकार आले. हातकणंगले लोकसभा मतदार संघात 6 पैकी 5 विधानसभा मतदार संघात महायुतीच्या विचाराचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांचे महायुतीमध्ये चांगलेच वजन वाढले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांचा केंद्रात सन्मान होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
राज्यात 5 डिसेंबर रोजी महायुतीचे सरकार स्थापण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपकडून लोकनेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी विविध पर्याय सुचविले जात आहेत. भाजपकडून आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असा सुर आळवला जात आहे. या बदल्यात केंद्रात शिवसेनेला आणखीन मंत्रीपदं देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आल्याचे कळते. हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मान्यता केला तर धैर्यशील माने यांचा नंबर वरच्या क्रमांकाचा असून त्यांचाच विचार होऊ शकतो.