संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेली काही महिन्यांपासून बंद असलेले ‘2 नंबर’ उद्योग सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात गावठी सुरू करण्यात आली असून मटका, क्लब आणि जुगारासाठी ‘अर्थपूर्ण’ चर्चा सुरू असून आठवड्याभरात या उद्योगाचेही पूर्ववत बस्तान बसेल, अशी दबक्या आवाजातील चर्चा पेठा भागात सुरू आहे.
काही महिन्यापूर्वी हातकणंगले पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हद्दीतील सर्वच ‘2 नंबर’च्या व्यवसायास चाप लावला. माणगाव, मुडशिंगी येथील गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याची धडक मोहीम उघडली. मागील दोन महिन्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारू अड्डे आणि उत्पादन केंद्रे पूर्णत: बंद होती. अशाच पध्दतीने चौका-चौकात सुरू असलेल्या मावा टपर्यांवरही कारवाई करण्यात आली होती.
मात्र दोन दिवसातच पुन्हा राजरोसपणे टपर्या सुरू झाल्या. तर आठ दिवसांपासून माणगाववाडी, मुडशिंगी येथून गावठीचा गावा-गावात पूर्ववत पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे ‘दरवाढी’साठी कारवाईचे नाटक होते का? असे लोक उघड बोलत आहेत. आता मटका जुगार आणि क्लब सर्वाधिक ‘माया’ मिळवून देणारे उद्योग पुर्ववत सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या व्यवसायामुळे अधिकार्यांसह काहींच्या चुली पेटतात. तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि होत आहेत.
असे काहींचे संसार चालविणारे आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारे उद्योग पुन्हा सुरू झाले तर हातकणंगले पोलीसांनी यापुर्वी केलेल्या कारवाया संशयाच्या भोवर्यात सापडू शकतात. दरम्यान, दोन वरिष्ठ अधिकार्यांच्यात धुमसत असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाल्यानंतरही प्रक्रिया सुरू झाल्याचे बोलले जात आहे. आता पहावे लागेल हे उद्योग सुरू करण्यासाठी 1 आणि 2 नंबरच्या अधिकार्यांमध्ये ‘वाटा’ कसा ठरलेला आहे.