Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरात मोकाट जनावरांच्या वावरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि रहिवासी भागात मोकाटपणे फिरणार्‍या जनावरांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे 25 कि.मी.हून अधिक विस्तार असलेल्या शहरात गायी, बैल, गाढवे, कुत्री, घोडे यांसारख्या जनावरांचा वावर सर्रास पाहायला मिळत आहे.
या मोकाट जनावरांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. काहीवेळा वाहनचालकांची अडचण होऊन अपघातही घडत आहेत. अशा अपघातांमध्ये अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर गटागटाने फिरणारी जनावरे केवळ वाहतुकीला अडथळा ठरत नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करत आहेत. शहरातील काही भागांमध्ये संबंधित जनावरांचे मालक वारंवार सूचना देऊनही जनावरे रस्त्यावर सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वी स्थानिक प्रशासनाने अशी जनावरे पकडून मालकांकडे सुपूर्द केली होती, परंतु ‘पुन्हा मागे तसे पुढे’ म्हणीप्रमाणे ती रस्त्यावर सोडण्यात आली आहेत. त्यामुळे ही समस्या कायम आहे. नागरिकांनी मोकाट जनावरांच्या व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने सक्रिय होऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. यासाठी जनावरे रस्त्यावर सोडणार्‍या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच पकडलेल्या जनावरांची योग्य देखभाल व व्यवस्थापन सुनिश्चित करावे, असे नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. तसेच मोकाट जनावरांच्या समस्येवर त्वरित तोडगा निघाला नाही तर भविष्यात यामुळे होणारे अपघात व वाहतूक समस्यांचा गंभीर सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.