Spread the love

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहर, लक्ष्मी आणि पार्वती औद्योगिक वसाहत याठिकाणी उभारण्यात येणार्या नवीन अत्याधुनिक सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पाच्या अनुषंगाने आ. राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून मुंबई येथे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेलारसु यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. त्यामध्ये प्रकल्पांची उभारणी, त्याचे कामकाज व देखभाल संदर्भात सविस्तर चर्चा झाली. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास प्रदुषणाचा प्रश्‍न संपण्यास मोठी मदत होणार आहे. कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावांतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्यामुळे देशातील प्रदुषित दहा नद्यांमध्ये तिचा समावेश झाला. ही पंचगंगा प्रदुषणमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. प्रदुषणमुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत एमआयडीसीकडून 529 कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. या तीन अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारणीसाठी सर्वच विभागांकडून तात्विक मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी 25 आणि उद्योग विभागाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मोडगिरे, कोल्हापूर मंडळाचे अधिकारी हजारे, माने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यासह प्रोसेस उद्योजक गिरीराज मोहता, अजित डाके, संदीप सागावकर, संदीप मोघे, शहाजहान शिरगांवे, विलास शिसोदे, अनिल कुडचे, तुषार सुलतानपुरे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.