इचलकरंजी शिरदवाड मार्गावरील यशोदा पुलावरील घटना
प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
पंचगंगा नदीतीरावरील वरदविनायकाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यामध्ये सौ. सुनिता संजय वडींगे (वय 55 रा. रिंगरोड मंगळवार पेठ) या जागीच ठार झाल्या. तर इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे निवृत प्रभारी अधिकारी संजय सदाशिव वडींगे (वय 58) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेने पोलिस, होमगार्ड दलासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास येथील यशोदा पुलानजीक ही दुर्घटना घडली.या प्रकरणी सुरज संजय वडींगे (वय 32) याने गावभाग पोलिसात वर्दी दिली असून पोलिसांनी डंपरचालक शब्बीर चांदसाहेब जर्मन (वय 37 रा. दत्तनगर शहापूर) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, संजय वडींगे हे येथील इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे प्रभारी अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत होते. पंधरा दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे संजय आणि सुनिता वडींगे हे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन (क्र. एमएच 09 एटी 0604) वरुन पंचगंगा नदीतीरावरील वरदविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन हे दाम्पत्य घराकडे परतत होते. येथील यशोदा पुलानजीक ते आले असताना त्यांच्या पाठीमागून डंपर (क्र. एमएच 09 एफएल 5418) येत होता. अचानकपणे वडींगे दाम्पत्याची दुचाकी घसरली आणि पाठीमागून येणार्या डंपरचे चाक सुनिता वडींगे यांच्या डोक्यावरुन आणि संजय वडींगे यांच्या कंबरेवरुन गेले. त्यामध्ये सुनिता वडींगे या जागीच ठार झाल्या. तर गंभीररित्या जखमी झालेल्या संजय वडींगे यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना संजय यांचाही मृत्यू झाला. वडींगे दाम्पत्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
संजय वडींगे यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. पंधरा दिवसांपूर्वीच संजय वडींगे हे सेवानिवृत्त झाले होते. वडींगे दाम्पत्य दररोज सकाळी वरदविनायकाच्या दर्शनासाठी जात होते. आजही ते नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेले होते. परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.गावभाग पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.