बस्तवाड व शेडशाळ येथील बैठकीत माहिती
जयसिंगपूर/महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबविताना महापुराचा धोका ओळखून मेन पाईपलाईन थेट नदीपात्रात सोडून त्याला नॉन रिटर्न हॉल बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पुराचा कोणताही धोका या प्रोजेक्टला होणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. हा प्रोजेक्ट राबविताना २० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सेवा सोसायटीच्या माध्यमातून तातडीने प्रस्ताव पाठविल्यास ते तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, सध्या २६ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे, पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ७ गावात ही योजना राबविण्यात येत आहे, त्यामुळे २३ कोटी रुपयांच्या माध्यमातून १२७५ एकर शेती कायमस्वरूपी क्षारपडमुक्त होणार असल्याची माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
बस्तवाड व शेडशाळ येथे क्षारपडमुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून २६ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला असून ८ गावाला हा पायलट प्रोजेक्ट मंजूर झाला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना ८०% रक्कम देणार असून २०% शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने बस्तवाड येथे बाधित असणाऱ्या सुमारे ८० हेक्टर, शेडशाळ येथे ४०.६४ हेक्टर क्षेत्रात हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल. १ एकर क्षेत्राला राज्य शासन १ लाख २५ हजार देत आहे. तर २० टक्के रक्कम म्हणजे २९ हजार ८०० रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सदरची रक्कम शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे.
सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे, शेतातील क्षेत्र रिकामी होत आहेत, त्यामुळे क्षारपडचा प्रोजेक्ट याचवेळी करावे लागणार आहे, अन्यथा पावसाळा सुरू झाला तर पुन्हा एक वर्ष वाया जाणार आहे, त्यामुळे शासकीय अधिकारी, गावातील सर्व संस्थेचे सेक्रेटरी यांनी शेतकऱ्यांचे सातबारे सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून त्यांच्या फाईली लवकरात लवकर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठवाव्यात त्यांना तात्काळ कमी व्याजदरात कर्जपुरवठा केला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. एचडीपीई, डीडब्ल्यूसी पाईपांचा वापर होणार आहे, याचबरोबर मेन लाईन १ फूट व्यासाची असणार ही लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, महापुराचा धोका ओळखून या पाईपांना नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय यळगुडे, कनिष्ठ अभियंता जयवंत पडूळकर, व्ही. ए. कदम यांनी या प्रोजेक्ट बद्दल टेक्नीकल माहिती दिली.
यावेळी बस्तवाड व शेडशाळ मधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी प्रभाकर मोरे, निरीक्षक प्रवीण चव्हाण, सुनील पाटील, बस्तवाड येथे झालेल्या बैठकीत कृष्णामाई विकास सोसायटीचे चेअरमन शब्बीरअहमद पटेल, आझाद विकास सोसायटीचे चेअरमन जयदीप चौगुले, किसान सोसायटीचे चेअरमन अफसर पटेल, सागर ऐनापुरे, सुनील सुतार, तात्यासो चौगुले, चंद्रकांत जंगम, प्रकाश लाटकर, बाबुराव ऐनापुरे, कुमार नागावे, असिफ पटेल, सुरेंद्र जंगम, अण्णासो चौगुले, राजेंद्र चिंचवाडे, प्रदीप चौगुले यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेडशाळ येथे झालेल्या बैठकीत शेडशाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र यळगुडे, शेडशाळ ग्रामविकास सेवा सोसायटीचे चेअरमन अविनाश तकडे, वसंत पवार, कल्लाप्पा कांबळे, विजय कोळी, शरद हरोले, सनाउल्ला पठाण, अविनाश गोपाळे, संजय मोळे, कुंतीनाथ उपाध्ये, सुरेश नायकवडे, मुरारी गुपचे, गणेश वाडीचे सरपंच प्रशांत अपीने, किरण संकपाळ, धनपाल खोत, राजू कुचनुरे, मोहन पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.