प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
बँकेचा अहवाल न मिळाल्याच्या रागातून एकाने येथील सातपुते गल्लीतील बिरदेव सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात बँकेचा मुख्य काचेच्या दरवाजाची तोडफोड करून नुकसान केले . याप्रकरणी संशयित उत्तम बंडगर (रा.शहापूर) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बिरदेव सहकारी बँकेत सभासद उत्तम बंडगर हे आईसोबत आले होते. बँकेचा अहवाल मिळाला नसल्याबाबत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी पोस्टाने अहवाल पाठवल्याची नोंद दाखवली. त्यानंतर काही वेळ ते आईसोबत बँकेच्या बाहेरच थांबले होते. दरम्यान बाहेर आलेले एका बँक कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी, संचालक यांच्याही अंगावर धावून गेला.
बाहेर येत असताना बँकेचा मुख्य दरवाजाची आदळा आपट करत तोडफोड केली. त्यामुळे दरवाज्यावरील दोन्हीकाचा फुटून दारात काचांचा सडा पडला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस दाखल झाले. संशयित बंडगर याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बँक अधिकारी, कर्मचारी संचालक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जावून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.