शिरटी, हसुर व उमळवाड येथे बैठक संपन्न
जयसिंगपूर/महान कार्य वृत्तसेवा
क्षारपडमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवताना शेतकर्यांना कोणत्याही कागदपत्रांची अडवणूक न करता त्यांचा सातबारा देखील ज्या – त्या विकास सेवा सोसायटीने काढावा, यासाठी सोसायटी सेक्रेटरींनी पुढाकार घेऊन उर्वरित 20 टक्के रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे एकत्रित प्रस्ताव तयार करून द्यावा तो तात्काळ मंजूर केला जाईल, जेणेकरून येत्या काही दिवसात या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
शिरटी, हसुर व उमळवाड येथे क्षारपडमुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकर्यांची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून 26 गावांचा सर्व्हे पूर्ण झाला असून 8 गावाला हा पायलट प्रोजेक्ट मंजूर झाला आहे. राज्य शासनाने शेतकर्यांना 80% रक्कम देणार असून 20% शेतकर्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने शिरटी येथे बाधित असणार्या सुमारे 116.17 हेक्टर, हसुर येथे 71.19 व उमळवाड येथे 32 हेक्टर क्षेत्रात हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. शेतकर्यांना 20 टक्के रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल. 1 एकर क्षेत्राला राज्य शासन 1 लाख 25 हजार देत आहे. तर 20 टक्के रक्कम म्हणजे 29 हजार 800 रुपये शेतकर्यांना भरावे लागणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सदरची रक्कम शेतकर्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे.
सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे, शेतातील क्षेत्र रिकामी होत आहेत, त्यामुळे क्षारपडचा प्रोजेक्ट याचवेळी करावे लागणार आहे, अन्यथा पावसाळा सुरू झाला तर पुन्हा एक वर्ष वाया जाणार आहे, त्यामुळे शासकीय अधिकारी, गावातील सर्व संस्थेचे सेक्रेटरी यांनी शेतकर्यांचे सातबारे सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून त्यांच्या फाईली लवकरात लवकर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठवाव्यात त्यांना तात्काळ कर्जपुरवठा केला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. असेही त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय यळगुडे यांनी या प्रोजेक्ट बद्दल माहिती देताना सांगितले या कामात एचडीपीई, डीडब्ल्यूसी पाईपांचा वापर होणार आहे, याचबरोबर मेन लाईन 1 फूट व्यासाची असणार ही लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, महापुराचा धोका ओळखून या पाईपांना नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार आहे, जेणेकरून महापुराचे पाणी पाईपच्या माध्यमातून रिटर्न शेतात येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली असल्याचे सांगितले.