मिरज/महान कार्य वृत्तसेवा
मिरज येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेचे समन्वयक मतीन काझी यांच्याबरोबर खुनी हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. आर्थिक देवाण-घेवाणीतून दुसर्या एका टोळीने त्यांच्यावर हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मिरज येथे पुन्हा एकदा टोळी युध्दाचा भडका उडतो की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत घटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथील रविंद्र येसाळे, मिरजपासून जवळच असलेल्या टाकळी रोडवर रविंद्र येसूमाळी यांचे रस्सा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये येसूमाळी आणि एका कामगारामध्ये देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. यात अमन गोधड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला व शिव अथणीकर या टोळीने हॉटेलवर येवून जोरदार राडा केला. यात हॉटेल मालक येसूमाळी आणि त्यांच्या पत्नी वैशाली यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात हे दोघे गंभीर जखमी झाले. याचवेळी शिंदे गटाचे युवा सेना समन्वयक मतीन काझी याठिकाणी जेवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्यावरही कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये काझीसह तिघेजण गंभीर जखमी झाले. याची माहिती काझी यांच्या टोळीतील कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी संशयितांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्याची मोडतोड केली. दरम्यान, या दोन टोळींमध्ये हल्ला आणि प्रतिहल्ला झाल्याने मिरजमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मिरजमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी लाठीजार्च करून जमावाला पांगवले. जखमी तिघांवर उपचार सुरू असून हल्लेखोर अद्याप फरार असल्याचे समजते.