Spread the love

अहिल्यानगर/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा ङ्गटका बसला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर आरोप केले जात आहेत. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात पहिले आंदोलन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्यात आली. पाथर्डी तहसील कार्यालयासमोर रोहित पवार आणि प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले. ईव्हीएम मशीन विरोधातील राज्यातील हे पहिलेच आंदोलन नगरमध्ये पार पडले असून महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे.
रोहित पवार म्हणाले, पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात प्रताप ढाकणे, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदारांनी इच्छा व्यक्त केली होती. लोकांची भावना प्रताप ढाकणे यांच्या बाजूने होती, ते आमदार झाले पाहिजे ही जनतेची इच्छा होती. या मतदारसंघाचे वातावरण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने होते. लोकांनी ही निवडणुकीत हाती घेतली होती. प्रताप ढाकणे आमदार बनावे यासाठी जनतेने कष्ट घेतले होती. मात्र या मतदारसंघातील निकाल येथील जनतेला मान्य नाही. त्यामुळे आम्ही आज येथील तहसील कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात ईव्हीएम मशीनची होळी केली. सामान्य लोकांना आता ईव्हीएमवर शंका वाटत आहे. ही शंका वाटणे लोकशाहीत योग्य नाही.