इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत रक्षा विसर्जनावेळी जाणारी रक्षा विसर्जित करून नदी प्रदूषण होऊ नये तसेच त्या रक्षेचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात यावा याकरिता दीपस्तंभ युवा मंच ने २०१६ साली इचलकरंजी नगरपालिकेस २ रक्षाकुंड बसवून दिले. इचलकरंजी शहरातील नागरिकांनी अंत्यविधी नंतर श्रद्धेसाठी १ मूठ रक्षा नदीत तर इतर रक्षा कुंडात विसर्जन करून पर्यावरण पूरक उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
सलग ८ वर्षे सुरळीत सुरू असलेल्या या उपक्रमात काही समाजकंटकांनी मृत व्यक्तींच्या शरीरावरील दागिण्यासाठी सदर रक्षा चाळण करत त्यात दागिने शोधण्याचा व ती चाळलेली रक्षा परत नदीपात्रात विसर्जित करण्याचा दुर्देवी प्रकार काही महिन्यांपासून घडत आहे. त्यामुळे तेथे असणाऱ्या कुंडाची मोडतोड ही करण्यात आली आहे. यावर दीपस्तंभ युवा मंच ने आवाज उठवल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी याची दखल घेतल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले व याबाबत उपाययोजनेची चर्चा सुरू झाली.
उपायुक्त स्मृती पाटील यांनी पुढाकार घेत तात्काळ दीपस्तंभ युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून घेत म्हणणे ऐकून घेतले, बांधकाम विभागाचे अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्यासह आरोग्य विभागाचे विजय पाटील यांच्यासह स्मशानभूमी गाठली. तेथे पाहणी करत त्यांनी सदर कुंडातील रक्षा व्यवस्थित रहावी व उठाव व्हावा याकरिता बांधकाम विभागास भिंत बांधून रक्षा हौद करण्याचे आदेश दिले.
त्याचबरोबर रक्षा चाळून गैरप्रकार करत असलेल्या समाजकंटकांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करून पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करणार असल्याचेही सांगितले. यावेळी दीपस्तंभ युवा मंचचे पंडित ढवळे, नितीन ठिगळे, उमेश पाटील, प्रशांत गलगले, शितल मगदुम, बाळु भंडारी उपस्थित होते.